लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनुमळे अनेक उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गावोगावात स्थापित केलेल्या बचतगटांची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत बँकांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, शिवाय विम्याच्या माध्यमातून या बचतगटांना अर्थसहाय्य करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने महिला दाखल झाल्या होत्या. शहरातील एमआयडीसी ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात फिजिकल डिस्टन्सचा पुरता बोजवारा उडाला.
कोरोनाच्या महामारीत अनेक लहान-मोठे उद्योग नुकसानीत आहेत. बचतगटांच्या माध्यमातून राज्यात महिलांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. महिलांचे गट निर्माण करून लहान- मोठ्या व्यवसायासाठी कर्जही मंजूर झाली आहेत. या कर्जाच्या आधारावरच आज खेडेगावातील महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून बचत गट चालू ठेवणेही अवघड होत आहे. त्यामुळे कर्जफेड तर दूरच परंतु कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा, असा प्रश्न या महिलांसमोर आहे. उमेदमुळेच महिला बचत गटांना उभारी मिळाली आहे. पण आता उमेदच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. त्यांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यांच्या फेरनियुक्त्या करण्यात याव्यात आणि नियुक्तीमधील जाचक अटी रद्द करण्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळेच बचत गटातील महिलांचे प्रश्न घेऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासूनचा हा सर्वात मोठा मोर्चा होता. हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. पण फिजिकल डिस्टन्सचे पालन होताना दिसत नव्हते. त्यामुळे आता काय कारवाई केली जाते का हे देखील पाहावे लागणार आहे.
पतसंस्था किंवा बँकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने आर्थिक मदत द्यावी, या मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मनसेचे दिलीप धोत्रे, डॉ. नरसिंह भिकाने यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. सर्वच जिल्ह्यात मनसेच्यावतीने मोर्चे काढले जात आहेत. यासंबंधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्वरित हा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचे संतोष नागरगोजे यांनी स्पष्ट केले आहे.