लातूर - सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अधिकारी- कर्मचारी यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही चाकूर येथील पशु-वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहत नाहीत. त्यामुळे मनसेच्यावतीने पंचनामा करण्यात आला, तर गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी मनसेच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.
तालुक्याच्या ठिकाणीदेखील अधिकारी- कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. यासंदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नृसिंह भिकाने यांनी अनेकवेळा निवेदनही दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पॉट पंचनामा केला. दरम्यान, पशु वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर असल्याचे दिसून आले. डॉ. सरवदे हे मुख्यालयी राहत नाहीत. शिवाय गावातूनच कारभार हाकत असल्याचा आरोप भिकाने यांनी केला आहे. डॉ. सरवदे यांच्याकडे तीन ठिकाणाचा पदभार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे चाकूरसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी आता तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.
तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी 10 ऑगस्टपासून स्वतंत्र अधिकरी देण्यात येणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे आश्वासनाची अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. भिकाने यांनी दिला आहे.