लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील लागवडीकरता कृषी विभागांतर्गत बांधावरच खते व बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. निलंगा तालुक्यातही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले. तसेच, यावेळी आमदार निलंगेकर यांनी ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणीचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.
खरीप हंगाम २०२०-२१ साठी कृषी विभाग निलंगा व गौर ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, गौर अंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप व रुंद सरी वरंबा (BBF) पेरणी प्रात्यक्षिकाचे आयोजन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळेस आमदार निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरद्वारे बीबीएफ पेरणीचे प्रात्यक्षिक दिले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करावी, जेणेकरून शेतीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल, असेही आमदार निलंगेकर म्हणाले. यावेळी खते व बी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही याची हमी कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश तालुका कृषी विभागास दिले गेले. याप्रसंगी निलंगा तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, माजी जि.प.अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपसरपंच रोहित पाटील, गौर ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे ज्ञानोबा चामे, केशव पाटील, सचिन आहेरकर, योगेश सांडूर, नामदेव दैतकर, माधव पवार, माधव गजभार, बाबा बोरोळे, राजीव सूर्यवंशी, संतोष मुगळे, विठ्ठल टोकले, अशोक सावंत, बाळासाहेब पाटीलसह शेतकरी उपस्थित होते.