लातूर - ग्रामीण भागातील विकास आणि बेरोजगारांच्या हाताला काम असा दुहेरी उद्देश साधणारी मनरेगा ही योजना आहे. गावच्या विकासासाठी आमदार, खासदार यांच्या निधीवर अवलंबून न राहता विकास कामाची गंगा यातून वाहू शकते. त्या अनुषंगाने औसा येथे मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच यांची कार्यशाळा पार पडली. या दरम्यान, मनरेगाच्या माध्यमातून विकास कामे करणाऱ्या गावास 25 लाखाचे बक्षीस देण्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे.
काळाच्या ओघात गावच्या लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे मनरेगाच्या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ वित्त आयोगातील निधीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. पण, गावच्या विकासाच्या दृष्टीने गावातील शेतरस्ते, पानंदरस्ते, सिंचन विहिरी, जनावरांचा गोठा, जुन्या जलस्रोतांचे पुननर्जीवन यासारखे महत्वाचे उपक्रम याच माध्यमातून राबवले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने या कार्यशाळेत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. औसा मतदारसंघातील गावागावात याबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने क्रिएटिव्ह फाउंडेशनच्यावतीने आमदार अभिमन्यू पवार यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी मान्यवरांनी योजनेची अंमलबजावणी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची उपस्थिती होती.
मनरेगाच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलता येतो. मात्र, गावस्थरावर सरपंच, उपसरपंचांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांचीही मोठी उपस्थिती होती.
हेही वाचा - गुटखा विक्रेत्याकडून लाच घेणारा पोलीस नाईक एसीबीकडून चौकीसमोरच जाळ्यात