उदगीर :उदगीर येथील लाईफकेअर रुग्णालयात मराठवाड्यातील पहिली आरटीपीसीआर मोबाईल व्हॅन दाखल झाली असून आता कोरोना संशयित रुग्णांना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट तत्काळ मिळणार असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार करता येणार आहेत.
कोरोना बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार केले तर रुग्ण गंभीर होऊन त्याला प्राणवायूची आवश्यकता भासणार नाही. नागरिकांनीही घाबरून न जाता वेळेत तपासणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्ण घरी राहूनही बरा होऊ शकतो. रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता भासत नाही, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
लातूर जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासणीसाठी एकमेव लॅब असल्याने रिपोर्ट मिळण्यासाठी तीन-चार दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे कोरोना बाधित व्यक्तीमुळे अनेकांना संसर्ग होण्याचा धोका असतो. आता या मोबाईल व्हॅनमुळे उदगीरमध्ये अवघ्या काही तासांत आरटीपीसीआर रिपोर्ट मिळणार असल्याने नागरिकांची सोय झाली आहे.
कोरोना संशयितांच्या अधिकाधिक तपासण्या करता याव्यात यासाठी सिनेअभिनेते अक्षयकुमार यांना विनंती केली होती. त्यांनी ती तात्काळ मान्य करुन त्यासाठी आवश्यक आसणारी सर्व अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करुन साई फाऊंडेशनच्या माध्यमातून उदगीर येथील लाईफकेअर रुग्णालयात तात्काळ व्हॅन पाठवून दिल्याने उदगीर व परिसरातील नागरिकांना अवघ्या काही तासांत आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट मिळणार आहे.
भारत सरकारच्या आयसीएमआर आणि एनआयव्ही द्वारा मान्यता प्राप्त 'माय लॅब' संचलित फिरते आरटीपीसीआर करिता सिनेअभिनेता अक्षय कुमार यांनी संपूर्ण अत्याधुनिक उपकरणे दिली आहेत. तर 'माय लॅब' ने मोबाईल व्हॅन दिली आहे . यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे,जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे, डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे , बस्वराज पाटील नगराळकर , माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.