लातूर - गेल्या अनेक दिवसांपासून तळ्यात-मळ्यात असलेले एकनाथ खडसे हे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने त्यांना निमंत्रण दिले होते, परंतु अगोदरच त्यांचे बुकिंग राष्ट्रवादीत झाली होती. असे असले तरी त्यांनी आता 'पर्मनंट' महाविकास आघाडीबरोबर राहण्याची इच्छा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे.
भाजपत असूनही गेल्या अनेक वेळा एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी स्पष्ट व्यक्त केली होती. अखेर शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एक ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महाविकास आघाडी सरकारला त्यांच्या प्रवाशाने तर फायदा होणारच आहे. आघाडीतील कोणत्याही एका पक्षात आले पण आता त्यांनी कायम याच ठिकाणी राहणे आवश्यक आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच सरकारला होणार आहे. त्यामुळे प्रवेशच नाही तर राष्ट्रवादीने त्यांना सरकारमध्येही आणावे, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
हेही वाचा - मंदिरे उघडण्याच्या मागणीचा सरकारकडून अनादर; विखे-पाटलांनी घेतली राज्यपालांची भेट
शेतकरी, मजूर आणि बहुजनांचे प्रश्न यापूर्वी विधानसभेत मांडलेले आहेत. त्यामुळे जनतेलाही त्यांच्या या परिवर्तनाचा फायदा होणार आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांच्या प्रवेशाच्या वावड्या उठत होत्या. शिवसेनेनेही त्यांना निमंत्रण दिले होते, पण त्याचे बुकिंग हे राष्ट्रवादीत झाले होते. मात्र, महाविकास आघाडीतील एका पक्षात त्यांचा प्रवेश होतोय याचा आनंद होत असल्याचेही यावेळी अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
बुधवारी लातूर जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी करून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी सरकार कर्ज काढेल पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय काँग्रेसच्या आणि आता शिवसेनेच्या काळातील आपला अनुभव काय हे देखील त्यांनी दिलखुलास मांडले. प्रत्येक विभागाकडून त्वरित पंचनाम्याचे अहवाल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.