निलंगा (लातूर) - ब्रिक्स राष्ट्रांच्या युवा वैज्ञानिक संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी संदीप सोमवंशी याने सहभाग घेत प्रथम पारितोषिक पटकवले आहे. त्याला 1 लाख 48 हजार रोख आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.पाच राष्ट्रांमधील 100 युवा शास्त्रज्ञांना या संमेलनासाठी निमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये निलंगा तालुक्यातील सावनगीरच्या संदिपचा देखील समावेश होता. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भौतिकशास्त्राचा विद्यार्थी आहे. भारतातून या संमेलनासाठी 18 युवा शास्त्रज्ञांना निमंत्रण देण्यात आले होते.
21 ते 25 सप्टेंबरदरम्यान हे संमेलन पार पडलं. संमेलनात सायन्स स्टँडअप बँटल स्पर्धा घेण्यात आली. यात संदिपने प्रथम पारितोषिक पटकावले. त्याने या संमेलनामध्ये अतिसुक्षम चुंबकीय पदार्थांची निर्मीती आणि त्याचा वैद्यकीय क्षेत्रात होणारा फायदा यावर सुरू असलेल्या संशोधनाचा सारांश यावेळी मांडला. यापूर्वी संदिपला नोबल लॉरेटच्या परिषदेसाठी जर्मनीला देखील निमंञीत करण्यात आले होते. या परिषदेसाठी 88 देशांतून 580 जणांना निमंञित केले होते. भारतातून 15 जणांचा सहभाग होता.