लातूर - मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. अनेक मंडळात अतिवृष्टीही झाली आहे. त्यामुळे राज्यसरकार तर शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मात्र, नुकसान मोठे असल्याने आणि सध्याची आर्थिक स्थिती पाहता मदतीसाठी केंद्राकडेही विनंती केली जाणार, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
पावसामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील 2 लाख 70 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. याच पिकाला अधिक फटका बसला आहे. त्याअनुषंगाने राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकसान पाहणी दौरा केला.
रविवारी हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी घेण्यात आली. प्रत्यक्षात पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मात्र, सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडेही पाठविला जाणार आहे. राज्य सरकार सर्वतोपरी मदत तर करणार आहे. शिवाय वेळप्रसंगी केंद्राकडेही मदत मागितली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच केंद्राचे पथकही पाहणीसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे कर्ज वाटपापासून ते बियाणांच्या उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा सर्वच लोकप्रतिनिधी यांनी मांडला. मात्र, याबाबत ठोस कारवाई किंवा निर्णय कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला नाही.