लातूर - पावसाळा अंतिम टप्प्यात येत असताना जलसंकटाचे ढग अधिकच गडद होत आहेत. मांजरा धरणात केवळ ५.२५ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक राहिल्याने येथील औद्योगिक भवनातील पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले होते. मात्र, उद्योजकांकडून पर्याय उपलब्ध करेपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची विनंती करण्यात आल्याने उद्योगांना १ महिना आणि पिण्यासाठी २ महिने एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या शहरात १५ दिवस पाणी देऊनही केवळ २ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात आहे. यानंतर टँकरने पाणी पुरवठा करण्याची तसेच गरज भासल्यास रेल्वेने पाणी आणण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र, जनतेने काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे. शहरातील नागरिकांना २ ते ३ महिने पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने एमआयडीसीचे पाणी बंद करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, उद्योजकांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था करेपर्यंत पाणी सुरू ठेवण्याची विनंती केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरता पाणी पुरवठा सुरू केला असून, ऑक्टोबरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास १ ऑक्टोबरपासून पाणी बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा दुष्काळ सुरुच; चारा छावण्या १ ऑगस्ट पर्यंत चालू राहणार, पशुधन वाचवण्यासाठी सरकारचा निर्णय
मांजरा धरण परिक्षेत्रात पाऊस पडत नसल्याने शहरातील नागरिकांवर आणि उद्योजकांवर ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे वृक्षलागवडीवर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. पाणीटंचाईच्या झळा आता प्रत्यक्ष पिण्याच्या पाण्यापर्यंत आल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.