लातूर - भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही शुक्रवारी मध्यरात्री उशिरा लातूर लोकसभा मतदार संघाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्य लढत कुणामध्ये होणार ह स्पष्ट झाले असून काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने शृंगारे विरुद्ध कामत यांच्यामध्ये लढत होणार आहे.
भाजप आणि काँग्रेसकडून लवकर उमेदवार जाहीर होत नसल्याने लातूरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. गुरूवारी रात्री भाजपने आपला अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांची घोषणा केली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री काँग्रेसने मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिल्याचे घोषित केले आहे. मच्छिंद्र कामत हे मूळचे उदगीर येथील आहेत. यंदा पक्षाने स्थानिक उमेदवाराला संधी देण्याची मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे शिवाजी काळगे, पृथ्वीराज शिरसाठ यांची नावे चर्चेत होते. मात्र, मच्छिंद्र कामत यांचे नाव जाहीर करून मुख्य लढत कुणामध्ये होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लोकसभेची निवडणूक होत असली तरी खऱ्या अर्थाने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणूक आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने लावलेला सुरुंग रोखण्याचे अव्हान आमदार देशमुख यांच्यासमोर आहे. जिल्हा भाजपमय करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर कामाला लागले आहेत. आता काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, प्रमुख लढत ही भाजप-काँग्रेसमध्ये होणार आहे. अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराने फॉर्म भरलेला नाही. आजपासून बैठका, नागरिकांच्या भेटीगाठी याने प्रचाराची राळ उडण्याची शक्यता आहे.