लातूर - सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराई पडत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. खरीपातील तुरीबरोबरच कांद्याच्या वाढीवरही या ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊ लागला आहे.
खरीपापाठोपाठ रब्बीवरीलही संकट कायम आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे महिन्याभराच्या फरकाने पेरण्या झाल्या असून, जिल्ह्यात सार्वधिक पेरा हा हरभऱ्याचा तर त्यापाठोपाठ ज्वारीचा आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीच्या पिकातून भरुन काढण्यासाठी शेतकरी राबत आहे. मात्र, खरीप हंगामाप्रमाणेच रब्बीतही निसर्गाची अवकृपा कायम आहे. पेरणी झाल्यापासून किडीचा प्रादुर्भाव या पिकांवर होऊ लागण्याने उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अवकाळीचा फायदा केवळ तूर पिकाला झाला होता. तूर आता अंतिम टप्प्यात असताना सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे शेंग पोसण्यावर परिणाम होऊ लागला आहे. पिकावर आळीचा मारा होत असल्याने वाढ खुंटत आहे. तर कांद्याच्या पातीवर टाके पडून योग्य त्या प्रमाणात कांदे पोसले जात नाहीत. सध्या कांद्याला चांगला दर मिळत असतानाच हे ओढवलेले संकट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम करणारे आहे. हिवाळ्यात झपाट्याने पिकांची वाढ होते मात्र, बदलत्या वातावरणामुळे दुष्परिणामच अधिक होऊ लागले आहेत.