लातूर - पक्षाकडून सातत्याने डावलले जाणाऱ्या रमेश कराड यांनाच अखेर भाजपने विधान परिषद निवडणुकीचे अधिकृत उमेदवार ठरविले आहे. मंगळवारी नामनिर्देशन पत्राच्या छानणी प्रक्रियेदरम्यान नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. ऐनवेळी पक्षाने फिरवलेल्या भाकरीला अनेक कारणे असली तरी रमेश कराड यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.
विधानपरिषदेची निवडणूक यंदा बिनविरोध करण्याचा निर्धार सर्वच पक्षांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या वाटेला ४ जागा व इतर ५ जागा महाविकास आघाडीसाठी आहेत. भाजपने राजीकय खेळी करीत 5 उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. अनेक बड्या नेत्यांना डावलून नवख्यांना संधी दिली होती. यामुळेच रमेश कराड यांचा देखील पत्ता कट होईल अशी साशंकता निर्माण झाली होती. आज नामनिर्देशनाच्या दिवशी काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ऐनवळी पक्षाने रमेश कराड यांनाच विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. तर नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांना माघार घ्यावी लागली आहे.
विधानसभा निवडणुकीतच लातूर ग्रामीण मतदारसंघातून रमेश कराड यांना माघार घ्यावी लागली होती. ही जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली होती. त्यामुळे रमेश कराड यांची नाराजी तर होतीच मात्र, त्यांना विधानपरिषेदच्या उमेदवारीचे आश्वासन दिल्याने त्यांनी आपले बंड थंड केले होते. असे असतानाही आता विधानपरिषदेसाठी डावलले जात असल्याचे चित्र होते. असे असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. किमान आता तरी रमेश कराड यांनी माघार घेऊन नये, असा सूर लातूर ग्रामीण मतदारसंघातील जनतेचा होता. शिवाय राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने रमेश कराड यांनीही माघार घेतली नाही. दुसरीकडे पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांसारख्या मातब्बर नेत्यांना उमेदवारी डावलल्याने नेत्यांसह जनतेच्या मनात नाराजीचा सूर होताच. याला अधिकचे खतपाणी मिळू नये, म्हणून पक्षाने कदाचित ऐनवेळी हा निर्णय घेतला असावा.
आतापर्यंत रमेश कराड यांनी लोकसभेची एक निवडणूक तर विधानसभेच्या दोन निवडणुका लढविल्या आहेत. यामध्ये त्यांना पराभवालाच सामोरे जावे लागले होते. शिवाय गतवेळच्या विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर तिकीट डावलल्याने त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, ऐनवेळी माघार घेऊन त्यांनी राष्ट्रवादीची पर्यायाने धनंजय मुंडे यांची गोची केली होती. आतापर्यंत त्यांना केवळ डीसीसी बँकेच्या निवडणुकीत यश मिळाले होते. आता विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली असल्याने यंदा तरी आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार असा आशावाद आहे.