लातूर - मांजरा धरणाच्या पाण्यावर लातूरकरांची तहान आणि शेती अवलंबून आहे. गेले तीन दिवस कळंब आणि केज तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दोन महिन्यांपूर्वी मृतसाठ्यात असलेल्या धरणात आता 73.701 दलघमी पाणीसाठा तयार झाला आहे. शिवाय नदीपात्रातही पाणीपातळी वाढल्याने शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.
मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस लातूर जिल्ह्यात झाला आहे. मात्र, शहरासह येथील औद्योगिक वासाहतीला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण हे बीड जिल्ह्यातील केज तालुका हद्दीत आहे. गेले तीन दिवस कळंब आणि केज तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला आहे. आणखी तीन ते चार दिवस पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्रालगत असलेला ऊसाचे अधिक उत्पन्न घेतले जाते. नदीमध्ये पाणी वाढल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षी मांजरा धरण हे मृतसाठ्यात होते. यंदाही सुरुवातीच्या काळात पाऊस कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती.