लातूर - नागरिकांनी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सातत्याने पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. वेळप्रसंगी कारवाई केली जाते. मात्र, जेव्हा नियामांचे पालन करण्यास सांगणारे पोलीसच नियमांचे पालन करत नाहीत, तेव्हा काय घडते याचा प्रत्यय लातूर तालुक्यातील गातेगाव पोलीस ठाण्यात आला. कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन न करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी निलंबित केले आहे.
म्हणून झाली कारवाई -
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आठ दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्याच्या अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी आता प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन तेथील परस्थितीचा आढावा घेण्याचा धडाका सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लातूर तालुक्यातील गातेगाव पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. यावेळी महिला विश्रामगृहात चार कर्मचारी मास्कविना फिरत असल्याचे पिंगळे यांना आढळले. कायद्याचा धाक दाखवत सर्वसामान्य नागरिकांना आपण वेठीस धरतो, मग आपणही त्याचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे म्हणत अधीक्षकांनी जाधव, शिरसे, दापकर, गोईनवार या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
कर्मचाऱ्यांची उडाली भंबेरी -
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे प्रत्येक पोलीस ठाण्याला भेट देऊन आढावा घेत आहेत. ग्रामीण भागात असलेल्या ठाण्यांकडे अधीक्षक येणार नाहीत, असा समज कर्मचाऱ्यांचा होता. मात्र, भर दुपारीच पोलीस अधीक्षकांनी थेट ठाण्यात एंट्री मारल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली. यात काहींनी मास्क घातलेले नव्हते, तर कोणी झाडाखाली गप्पा मारत उभे होते. पोलीस ठाण्यातील हा प्रकार पाहून शिस्तप्रिय निखिल पिंगळे यांनी ही निलंबनाची कारवाई केली.
कारवाईबाबत ठेवण्यात आली होती गुप्तता -
या घटनेबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गातेगाव परिसरात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यात निलंबनाचे कारण समोर आले. कोरोना काळात नियमांचे पालन न केल्याने पोलिसांवर कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना असावी. कर्तव्यात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षकांनी शाळाही घेतली. कारभार स्वीकारून निखिल पिंगळे यांना आठ दिवसाचा कालावधी लोटला आहे. त्यांनी उदगीर, जळकोट, अहमदपूर या ठिकाणच्या पोलीस ठण्यांना भेटी दिल्या आहेत.