लातूर - लातूरला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार असे चित्र निर्माण झाले असतानाच एक नवे संकट मनपावर ओढावले आहे. गत वेळच्या रेल्वे वाहतुकीचे तब्बल ९ कोटी ९० लाखांचे बिल तीन वर्षांनंतरही रेल्वेला मिळालेले नाही. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाला बिल अदा करण्यासंदर्भात रेल्वेकडून पत्र पाठविण्यात आले आहे. दुष्काळात तेरावा अशी अवस्था मनपाची झाली आहे. हे बिल माफ करावे अशी विनंती मनपाकडून करण्यात आली आहे.
पावसाने पाठ फिरविल्याने मांजरा धरणातील पाणीसाठा मृतसाठ्यात आहे. केवळ ६ टक्केच पाणी शिल्लक असल्याने भविष्यात शहरासाठी रेल्वेने पाणी आणण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन करत आहे. बिल अदा न केल्यास यंदा गरज भासली तरी रेल्वेने पाणीपुरवठा होईल कि नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.
लातूर जिल्ह्यात २०१६ साली भीषण पाणी टंचाई होती. उपपययोजनेत उशीर होत असताना तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट करून रेल्वेने पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान दुष्काळ काळात १११ रेल्वेच्या फेऱ्या करण्यात आल्या होत्या. यासाठी रेल्वेला एकूण ९ कोटी ९० लाखांचा खर्च आला. याबाबत रेल्वे विभागाने लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना बिलाबाबत पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र महानगरपालिकेकडे पाठवले आहे. प्रत्यक्षात महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली असताना कोट्यवधींचे बिल आल्याने प्रशासन हतबल झाले आहे. त्यामुळे, हे बिल काही प्रमाणात का होईना माफ करावे यासाठी पत्रव्यहार करण्यात आला असल्याचे महानगरपालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी सांगितले आहे.