लातूर - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी जनजागृतीचे काम केले होते. एवढेच नाही तर कोविड सेंटरमध्ये जाऊन घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी मार्गदर्शन सुरूच ठेवले होते. दरम्यान, त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली होती तर मंगळवारी सर्दीचा त्रास होत असल्याने त्यांनी तपासणी केली असता त्यांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत आहे. सोमवारी 300 नागरिकांची तपासणी केली असता केवळ 24 जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तर मंगळवारी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी त्यांच्या उपस्थितीमध्येच लातुर मॅरेथॉनचे आयोजन झाले होते. त्यामुळे गेल्या 4 दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत होता. अखेर त्यांनी अँटीजन टेस्ट केल्यानंतर हे निष्पन्न झाले आहे. तब्येत चांगली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही त्यामुळे लातूरकरांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.