लातूर - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. सोमवारी लातुरात आमदार धीरज देशमुख यांच्यासह पदाधिकऱ्यांनी काँग्रेस भवन येथून सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावे, याबाबत धीरज देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या धोरणाबाबत काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. गत आठवड्यात लातूर शहरातील गांधी चौक येथे आंदोलन करून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला होता. तर चीनकडून केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींना विचारणा करण्यात आली होती. आज लातुरात आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने आंदोल करण्यात आले. शहरातील काँग्रेसभवन येथून आमदार धीरज देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मोईज शेख तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसाकाठी वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या महागाईचा सामना करावा लागत आहे. किमान आता तरी या वाढीवर निर्बंध लादावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असताना दुसरीकडे महागाईचा सामना करावा लागत आहे. या दुहेरी संकटातून सरकारने जनतेची सुटका करण्याची अपेक्षा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.