लातूर - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, असे असतानाही लॉकडाऊनची स्थिती ओढवली नसल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी बैठकीत सांगितले होते. परंतु, गेल्या दोन दिवसातील स्थिती पाहता जनतेनेच स्वतःहून शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोना रुगणाची संख्या वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी लातूरच्या खासगी हॉस्टेलमधील 45 विद्यार्थी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे लातुरात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच शहरात लोकांची गर्दी वाढली आहे. जिल्ह्यात आज ९८ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात मनपा हद्दीतील ७३ रुग्ण आहेत. आजपर्यंतचा कोरोनाबाधितांच्या मृत्युचा आकडा ७०३ वर गेला आहे. तर बुधवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात जातपंचायतीचा हात; 'अंनिस'चा आरोप
येत्या काळात कोरोन वर मात करायची असेल तर नागरिकांनी दक्ष राहावे लागेल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी म्हटले. त्यासाठी मास्क, सॅनिटीयझर व शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे. तसेच रविवारी आणि शनिवारी सुट्टी असताना अत्यावश्यक काम असल्याशिवाय बाहेर पडू नये, अशी काळजी घ्यावी. त्यासाठी हा स्वयंस्फूर्त कर्फ्यु असेल. जिल्ह्यातील नागरिकांनी आजपर्यंत संयम ठेवून साथ दिली आहे. या उपक्रमातही साथ द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीसाठी मंत्री राठोड वर्षा बंगल्यावर