लातूर- कोल्हापूरकडून लातूरकडे नातेवाईकाच्या अंत्यविधीला येताना औसा शहरातील अजीम महाविद्यालयाजवळ पिकअप दुभाजकाला धडकल्याची घटना घडली. या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी आहेत. चालकाजवळ बसलेल्या शोभाताई रंदवे यांना झोप अनावर झाली आणि त्या स्टेरिंगवर पडल्या. यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यात शोभाताई यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ज्याच्या अंत्यविधीला हे नातेवाईक येत होते त्या भगवान वाघमारे यांचाही अंत्यविधी अद्याप झालेला नाही.
हेही वाचा- CAA Protest: दिल्लीतील शाहीन बाग परिसरात 'जेल भरो' आंदोलनाला सुरुवात
दीर्घ आजाराने औसा रोडवरील भगवान वाघमारे (वय 65) यांचा रविवारी मृत्यू झाला होता. कोल्हापूर येथे राहणारे त्यांचे नातेवाईक सोलापूर मार्गे लातूरला येत होते. दरम्यान, त्यांनी तुळजापूरमधून शोभताई रंदवे यांना बरोबर घेतले. शिवाय लहान मुला-बाळांसह इतर २५ जण पिकअप मध्ये होते. चालकाजवळ शोभाताई बसल्या होत्या. दरम्यान, पहाटे ५ च्या सुमारास शोभाताई यांना झोप लागली. यामुळे त्यांचा तोल स्टेरिंगवर गेला. त्यामुळे पिकअप दुभाजकावर आदळला.
यामध्ये शोभाताई यांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष रसाळ हे गंभीर जखमी आहेत. या घटनेत लता रसाळ, लहू वाघमारे, ज्ञानेश्वरी वाघमारे, सतीश वाघमारे, मंगेश वाघमारे, शाहीर वाघमारे, ओम वाघमारे, नागनाथ कांबळे, गावळबाई कांबळे, सुग्रीव उंप, ज्योती देडे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे रविवारी मृत झालेले भगवान वाघमारे यांचा अंत्यविधी आद्यपही झाला नसताना त्यांच्याच नातेवाईकतील महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.