लातूर - सततचा दुष्काळ आणि नैसर्गिक अनिश्चितता यामुळे उत्पादनात घट होत असल्याने कव्हा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जीवन किसनराव घार, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीड लाखाचे कर्ज होते. तसेच रब्बी पिकाचा विमा न मिळाल्याने कर्जाचे ओझे वाढत होते.
मुलांच्या शिक्षणाचा खर्च, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि सततची नापिकी यामुळे हवालदिल झालेल्या या शेतकऱ्याने जीवन संपवले आहे. जीवन घार यांनीही मोठ्या हिम्मतीनं बँकेचं कर्ज घेऊन चार एकर शेती करण्याचं स्वप्न पाहिल होतं. मात्र, सततचा दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कर्जाची परतफेड करण्यात आलेले अपयश आणि घरप्रपंच चालवणे अवघड झाल्याने त्यांनी हो निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित घटनेचा पंचनामा करून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.