लातूर - लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून 8 ते 10 ने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. बुधवारी जिल्ह्यात 3 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
बुधवारी जिल्हयातून 52 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. यापैकी 47 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असून तिघांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत, तर 2 अहवाल हे अनिर्णित आहेत.
एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना आज 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये 68 वर्षीय महिलेला उच्च रक्तदाब, दमा यासारखे आजार होते. शिवाय गेल्या 12 दिवसांपासून ही महिला व्हेंटिलेटरवर होती. अशा परिस्थितीमध्येही या महिलेने कोरोनावर मात केली आहे. तर इतर लातूर शहरातील 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लातूर शहरातील भोई गल्लीतील एक तर उदगीर शहरातील हनुमान नगरातील 2 रुग्णांचा समावेश आहे. लातूर आणि उदगीर शहरताच दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता 64 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 10 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.