लातूर - निसर्गाचा लहरीपणा कायम आहे. एकीकडे रब्बी हंगामाची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर दुसरीकडे वाहतूक ठप्प असल्याने फळपिके शेतातच आहेत. हे कमी म्हणून की काय आता अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बी कामाचा खोळंबा झाला आहे. या पावसामुळे वावरातील फळपिकांना अधिकचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.असे असताना सोमवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. निलंगा तालुक्यातील निटूर, केळगावसह परिसरातील गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला असला तरी पिकांचे नुकसान झाले आहे. गत आठवड्यातही पावसाने अशीच हेजरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले होते. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी कायम नुकसानीचा ठरला आहे.