निलंगा (लातूर) - कोरोना काळात माणसे दुरावली, अनेकजनांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आपले जीव गमावले. परंतु तालुक्यातील हरीजवळगा येथील शेतमजूराला कॅन्सर झाल्याचे कळताच संपूर्ण गाव मदतीला धावले व उपचारासाठी निधी जमा केला.
निलंगा तालुक्यातील हरीजवळगा येथील रहिवासी शेतमजूर व्यंकट कासले यांची अत्यंत गरीब परिस्थिती. पत्नी सहा मुली एक मुलगा असा परिवार. गावातील अनेकांच्या शेतात शेतमजूरी करणारे कासले यांना मागील काही दिवसापूर्वी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची लातूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांना कॕन्सर असल्याचे निष्पन्न झाले. घरची हालाकीची परिस्थिती, घरात खायचे वांदे, जगावे का मरावे अशा परिस्थितीत घरातील सर्वच जन परेशान.
कासले यांना कॅन्सर झाल्याची बातमी गावात पसरली आणि संपूर्ण गाव त्यांना वाचवण्यासाठी कामाला लागले. गावातील सर्वच शासकीय नौकरदार ज्येष्ठ नागरिक सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी निधी जमा करायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी तब्बल १ लाख ३५ हजार रूपये निधी जमा केला. त्यानंतर तो निधी व्यंकट कासले यांना दवाखान्यात जाऊन गावातील काही प्रमुख लोकांनी दिला.
सध्या कासले यांच्यावर लातूर येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. दिनांक ८ सप्टेंबरला त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कासले यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी जो निधी लागेल तो संपूर्ण निधी हरीजवळगा या गावातील नागरिक देणार आहेत. हरी जवळगा गावातील प्रत्येक व्यक्ती जणू आपल्याच कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे अशा चिंतेत आहे. एका शेतमजुराचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले असून गावचा एकोपा बघता सगळ्याच गावांनी आदर्श घेण्यासारखे हरीजवळगेकरांनी कामगीरी केली आहे. या गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.