लातूर - जिल्ह्यातील उदगीर, औसा आणि लातूर ग्रामीण मतदारसंघात युतीकडून मोठे फेरबदल झाले आहेत. यामुळे इच्छुकांच्या पदरी निराशा पडली असून लातूर ग्रामीण मधून इच्छुक असलेले रमेश कराड यांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनाही गहिवरून आले. त्यामुळे युतीमधील नाराज उमेदवार नेमके काय निर्णय घेणार हे दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
हे ही वाचा - औसा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा रोष; मुख्यंत्र्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला विरोध
लातूर शहर आणि औसा मतदारसंघ हे शिवसेनेचे परंपरागत मतदारसंघ आहेत. मात्र, यावेळची राजकीय स्थिती पाहता या दोन्ही मतदारसंघावर भाजपाच्या उमेदवाराला संधी मिळाली आहे. तर लातूर ग्रामीणची जागा सेनेला सोडण्यात आली आहे. त्यामुळे लातूर ग्रामीण मधून इच्छुक असलेले रमेश कराड यांची उमेदवारी अडचणीत असल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी बुधवारी पालकमंत्री संभाजी पाटील यांच्याकडे आपले म्हणणे मांडले. रमेश कराड यांनाच उमेदवारी द्या अशी कार्यकर्त्यांनी विनंती केली. कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहून निलंगेकर यांनाही गहिवरून आले. गेल्या दोन महिन्यापासून रमेश कराड हे विधानसभेची तयारी करत होते. त्यानुसार उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सेनेला जागा सोडल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी कार्यकर्ते जमले होते.
हे ही वाचा - महाआघाडीच्या मित्र पक्षांचा 28 जागांवरुन तिढा; मात्र आघाडीत सामील होण्याचा केला दावा