लातूर- येथील औसा तालुक्यातील आलमला गावच्या सुरेश चित्ते यांना कर्तव्य बजावत असताना देशाच्या सीमेवर वीरमरण आले. मकरसंक्रांतीला ववसायला जाण्याची प्रथा आहे. त्यांच्या पत्नी त्याचीच तयारी करीत होत्या. मात्र, त्याचवेळी पतीच्या वीरमरणाची बातमी आल्याने तयारी करण्यापासून त्यांना रोखण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्या मूळ गाव असलेल्या आलमला येथे शोककळा पसरली असून संक्रातीसारखा सण देखील गावकऱ्यांनी साजरा केलेला नाही. संक्रातीनिमित्त होणारी याठीकाणची यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. गावातील बाजारपेठेत ग्रामस्थांनी बंद ठेवली असून चौकाचौकात जवान सुरेश यांच्या वीरमरणाची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा- लष्कर दिन: सरसेनाध्यक्षांसह तिन्ही सेनादल प्रमुखांनी युद्ध स्मारकाला वाहिली आदरांजली
३५ वर्षीय सुरेश चित्ते यांना कर्तव्य बजावत असताना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे सोमवारी त्यांना वीरमरण आले. सुरेश हे आलमला गावचे शहीद झालेले पहिलेच जवान आहेत. या दुःखद घटनेनंतर गावची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तर संक्रातीचा सण देखील गावकऱ्यांनी साजरा केलेला नाही. एवढेच नाही तर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणारी दोन दिवसीय यात्राही रद्द करण्यात आलेली आहे. सुरेश चित्ते यांच्या पार्थिवावर कुठे अंत्यसंस्कार करायचे? याबाबत सरपंच कैलास निलंगेकर तसेच तलाठी सोनवते व ग्रामस्थ यांच्यात बैठक सुरू आहे. शुक्रवारी गावच्या शिवारातच त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पत्नीची ववसायला जाण्याची लगबग आणि....
मकर संक्रांतीच्या दिवशी पतीला दीर्घायुष्य मिळावे याकरिता ववसायला जाण्याची प्रथा आहे. याचीच तयारी सुरेश यांची पत्नी करीत होती. पतीच्या निधनाबद्दल त्यांना अनभिज्ञ ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्या तयारीत असतानाच त्यांना रोखण्यात आले होते. ऐन मकरसंक्रांत दिवशीच पतीला वीरमरण आले. गावासह संबंध औसा तालुक्यात शोककळा पसरली असून उपमहाराष्ट्र केसरी ठरलेला शैलेश शेळके यांचाही सत्कार कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.