लातूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी 70 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तर, दोन दिवसांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोना झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते. आता आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उदगीर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या सातवर पोहोचली आहे.
सहा दिवसांपूर्वी लातूर जिल्हा ग्रीनझोनमध्ये होता. मात्र, शनिवारी एका 70 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांनतर उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली.
शहरातील 105 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 98 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर 7 जण हे पॉझिटिव्ह आहेत. सर्व रुग्णांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उदगीर शहरात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तीन दिवसाचा कर्फ्यू कायम आहे.