लातूर - शहरातील बार्शी रस्त्यावर असणाऱ्या एका सुपरमार्केटला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. यामध्ये 50 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बार्शी रस्त्यावर विश्व सुपरमार्केट आहे. शनिवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे या दुकानाला आग लागल्याचे समोर आले. संबंधित घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी दुकानमालक गुरुनाथ मगे यांना दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तत्काळ आग आटोक्यात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फर्निचर आणि वायरिंग देखील जळाल्याचे समोर आले. सध्या पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून मदतीची मागणी गुरुनाथ मगे यांनी केली आहे.