लातूर - विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयातील (Vilasrao Deshmukh Government Hospital Latur) बालरुग्ण विभागात फोटो समोर दिवा लावल्याने अचानक आग लागली. परंतू प्रसंगावधान राखत वेळेत आग आटोक्यात आणल्याने 37 बालके सुदैवाने बचावली आहेत.
शासकीय रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर नवजात शिशू अतिदक्षता विभाग आहे. येथील परिचारिकांच्या इन्चार्ज रुममधील फोटो समोर लावलेल्या दिव्यामुळे अचानक आग लागल्याने बाजूलाच असलेल्या नवजात शिशू (एनआयसीयू) विभागात ही आग पोहोचली. त्याठिकाणी 37 शिशू दाखल होती. या आगीमुळे संपुर्ण विभागात प्रचंड मोठा धूर निर्माण झाल्याने एकच धावपळ सुरु झाली. येथील 37 नवजात शिशूंना तात्काळ दुसऱ्या वार्डात हलविण्यात आले. सदरील आग भिंतीवर लावलेल्या फोटो समोर दिवा लावल्याने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अतिदक्षता विभागात आपत्कालीन मार्ग नाही
अतिदक्षता विभागात (ICU) ऑक्सिजनसाठी पाईपलाईन करण्यात आलेली असते. या ऑक्सिजनचे प्रमाण जास्त झाल्यास आग लागण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा विभागात अग्निरोधक यंत्रणा अधिक सक्षम असणे आवश्यक आहे. तसेच अशा विभागात आपत्कालीन मार्ग तयार असावा लागतो. परंतू, या रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागास आपत्कालीन मार्गच नाही. या घटनेची माहिती मिळताच बाळांचे नातेवाईक ज्या मार्गाने वॉर्डमध्ये जात होते, त्याच मार्गाने कर्मचारी बाळांना बाहेर काढत होते. यामुळे या विभागात एकच गोंधळ उडाला होता. सदरील आग कोणत्या कारणाने लागली याची चौकशी करण्यात येइल. त्यात जे कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येइल, असे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.