लातूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे खरिपातील सोयाबीनवरच अवलंबून असते. यंदा सर्व काही सुरळीत असताना निसर्गाच्या लहरिपणाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. पंधरा दिवसांपूर्वी पावसाने ओढ दिल्याने पिके धोक्यात होती. तर आता मुसळधार पावसामुळे पिके पाण्यात आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असेच चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम आणि या हंगामातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच बाजारपेठ उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा ओढा हा सोयाबीनकडे असतो. यंदा तर 4 लाख 59 हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होते. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे अहमदपूर, चाकूर, शिरुरांनातपाळ तालुक्यातील पिके सुकू लागली होती. तर आता सोयाबीन अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ लागला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये उदगीर, निलंगा आणि लातूर ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्याने संकटात असलेली पिके आज पाण्यात आहेत. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. गतवर्षी सोयाबीनची काढणी सुरू असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पीक वावरतच पडून होते.
यंदा काढणीला 15 दिवसाचा आवधी असताना पावसाने लावलेली हजेरी चिंतेची बाब आहे. सरासरीपेक्षा दुपाटीच्या क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली होती. पेरणी, मशागत यासारखी मेहनत करून आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोयाबीनला बसत आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. सोयाबीनबरोबर उभा असलेला ऊस आडवा झाला आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनातून दिलासा मिळेल असा आशावाद होता. परंतु, पावसाने गतवर्षीची पन्नरवृत्ती होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.