लातूर - जिल्ह्यात अनिश्चित स्वरुपाचा पाऊस कायम आहे. अहमदपूर, चाकूर तालुक्यातील पिके पावसाविना कोमेजू लागली आहेत. तर, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव गटात अतिवृष्टी झाली, मात्र मांजरा नदीवरील बॅरिगेट्सचे दरवाजे वेळेत न उघडल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन आणि ऊस पिकाचा समावेश असून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
जिल्ह्यात सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. मात्र, शेंगा भरण्याच्या प्रसंगीच काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही तालुक्यात कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव गटात अतिवृष्टी झाली. यातच पोहरेगावला लागूनच मांजरा नदीपात्रावर बॅरिगेट्स उभारण्यात आले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने बॅरिगेट्सवरील दरवाजे उघडणे गरजेचे होते. परंतु, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे बॅरिगेट्स बंदच राहिले, परिणामी नदीपात्रातील पाणी थेट शिवारातील पन्नास शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचले. यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
महसूल विभागाने पंचनामेही केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याची मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिदाजी जगताप यांनी केली आहे. बॅरिगेट्सची उंची १ मीटरने वाढवणे गरजेचे आहे. परंतु, नदीपात्राला लागून असलेल्या साखर कारखान्यांना पाणी मिळावे म्हणून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. सोयाबीन बहरत असताना शेकडो हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे ज्या तत्परतेने पंचनामे झाले, त्याच पद्धतीने नुकसानभरपाई देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- मराठा आरक्षण स्थगिती मिळाल्याने चाकूरात एमपीएससी करणाऱ्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न