लातूर - मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यावरील संकटाची मालिका यंदाही सुरूच आहे. खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. याच अवकाळी पावसाचा परिणाम आता रब्बी हंगामावरही झाला आहे. रब्बी हंगामातील पेरण्या महिनाभराच्या फरकाने लांबल्या आहेत. याचा रब्बी पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन रब्बीची पेरणी केली. मात्र, पेरणीला उशीर झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. मागील आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने किडीचा प्रादुर्भावही जाणवू लागला आहे.
खरीपातील सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतर सर्व पिके पाण्यात गेली होती. त्यानंतर नुकसान झालेल्या पिकांची पाहणी आणि पंचनामे झाले. शेतकरी मात्र, अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी 1 लाख 95 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 1 लाख 80 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याचे आहे. सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 1 लाख 47 हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 95 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पेरणीनंतर पिकांची वाढ खुंटत आहे, त्यामुळे खरीपानंतर रब्बीतही शेतकऱ्यांच्या पदरी काय पडणार? हा प्रश्न कायम आहे.