लातूर - सततच्या नापिकीला कंटाळून औसा तालुक्यातील जवळगा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतीतून उत्त्पन्न कमी झाल्यामुळे नातवांची लग्न करायची कशी, या विवंचनेतून नागोराव बनसोडे या वद्ध शेतकऱ्याने (वय ६०) विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली.
नागोराव बनसोडे यांच्याकडे कोरडवाहू शेतजमीन असून गेल्या ४ वर्षांपासून शेतीउत्पादनात सातत्याने घट झाली होती. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि तीन नातवांची लग्न करायची कशी? या विवंचनेत ते होते. या नैराश्येतून त्यांनी शुक्रवारी विषारी द्रव्य प्राशन केले. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत नोगोराव यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.