लातूर - डोक्यावर असलेले कर्ज आणि नापिकीला कंटाळून औसा तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मधुकर श्रीरंग पवार (वय-50, रा. अंदोरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
मधुकर पवार यांच्या मालकीची साडेतीन एकर जमीन आहे. त्यांच्यावर बँकेचे अंदाजित एक लाखाचे कर्ज होते. मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतीतील पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतात असलेले संपूर्ण पीक अजूनही पाण्यात असल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे? या चिंतेत ते होते.
याच परिस्थिती दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
मधुकर पवार यांच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा, 3 विवाहित मुली असा परिवार आहे. याप्रकरणी मृताचे नातेवाईक महादेव शेळके यांच्या फिर्यादीवरून भादा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.