लातूर - शेतातील सोयाबीन काढणीच्या वादातून 75 वर्षीय शेतकऱ्याची हत्या झाल्याची घटना शिरूरअनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे घडली. याप्रकरणी शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावसाहेब गुंडाजी गजिले असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रावसाहेब हे मूळचे चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी येथील रहिवाशी होते. शिरूरअनंतपाळ तालुक्यातील शिवपूर शिवारात त्यांचे शेत आहे. गजिले यांनी 20 वर्षांपूर्वी शिवपूर येथील हुसेन नबी शेख यांच्याकडून अडीच एकर शेतीची खरेदी केली. यापैकी दीड एकर शेती ही हुसेन नबी शेख यांची बहीण हिना शेख हिच्या नावावर होती. ही जमीन रावसाहेब गजिले यांना न देता गावच्या भास्कर कुंभार यांना देण्यात आली. यावरून सातत्याने वाद होत होते. गुरुवारी रावसाहेब गजिले हे सोयाबीन काढण्यासाठी गेले. यावेळी भास्कर कुंभार व अन्य पाच जणांनी शेतातील सोयाबीन काढण्यास मनाई केली. त्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. यातूनच त्यांना मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
पत्नी कमलाबाई रावसाहेब गजिले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पी. बी. कदम तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेलार यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.