लातूर - पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने पेरणी क्षेत्रातील पिकेही धोक्यात आली आहेत. डोळ्यादेखत सोयाबीनचे पीक करपू लागल्याने भिसे वाघोलीतील शेतकरी सत्तार पटेल यांनी ट्रॅक्टरने पेरणी केलेल्या पिकाची ट्रॅक्टरनेच कोळपणी केली. उत्पादन तर दूरच मात्र हा पूर्व खटाटोप करण्यासाठी त्यांना ९० हजाराचा फटका बसला आहे.
पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाखाहून अधिक असून आतापर्यंत ६५ टक्के पेरणी झाली. तर ३५ टक्के क्षेत्र हे पेरणीविनाच पडून आहे. मात्र, पेरणीपासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने उगवलेली पिकेही धोक्यात आहे. अपुऱ्या पाण्यामुळे सोयाबीनची वाढ खुंटली. शिवाय आता पाऊस होऊनही उत्पादन हाती पडणार नाही. उलट पीक कमी आणि तण जास्त अशी अवस्था होईल. यामुळे पटेल यांनी १० एकरातील सोयाबीनची ट्रॅक्टरने कोळपणीच केली.
यंदा दमदार पाऊस होईल, असा विश्वास हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसावर पेरणी केली. मात्र, आताच्या उघडीपने शेतकरी देशोधडीला लागला असून याला जबाबदार हवामान खाते आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचेही सत्तार पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
खत-बियाणे विक्रेते आणि हवामान खात्याचे लागेधागे आहेत. त्यांच्या फायद्यासाठीच हवामान खात्याकडून चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही शेतकरी सत्तार पटेल यांनी केला आहे.