लातूर - गेल्या तीन वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती आणि यंदा अतिवृष्टीने खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सततच्या नापिकीला कंटाळून लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव सेवन करुन आत्महत्या केली.
हेही वाचा- 'शिवसेनेशिवाय राज्यात सरकार नाही व मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच'
तालुक्यातील बोरगाव काळे येथील रामहरी आण्णा काळे (वय४२) हे अल्पभुधारक शेतकरी होते. संबंध कुटुंब शेतीव्यवसायावरच अवलंबून होते. घरची परिस्थिती हलाखीची असताना दरवर्षी शेती उत्पादनात घट होत होती. त्यामुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करावे या विवंचनेतून त्यांनी सोमवारी पहाटे राहत्या घरी विषारी द्रव सेवन केले. दोन मुलींची लग्न कशी करावीत हा प्रश्न देखील त्यांच्यासमोर होता. त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्याग्रस्त शेतकरी रामहरी अण्णा काळे यांच्या पश्चात त्यांच्या आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा थेट शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. यातच प्रशासनाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.