लातूर - मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने आर्थिक विवंचनेतून निलंगा तालुक्यातील हंगरगा(शिरसी) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. वाघंबर भगवान पवार (वय-40), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी (2-फेब्रुवारी) मध्यरात्री 11 वाजण्याच्या दरम्यान विष घेऊन त्यांनी आत्महत्या केली. याबाबत औराद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाघंबर पवार यांना 20 गुंठे जमीन असून त्यांचा एक मुलगा दिव्यांग आहे. शेती व रोजंदारीवर कुटुंबांचा गाडा चालवणारे वाघंबर पवार यांच्या मुलीचे लग्न करायचे होते. याच विवंचनेत ते काही दिवसांपासून होते. अखेर विष घेऊन त्यांनी जीवन संपवले.
यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलीस व तलाठ्यांनी पंचनामा केला. निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी उपसरपंच अंबादास जाधव यांना दूरध्वनीवर संपर्क करून संबंधित घटनेची चौकशी केली.