लातूर - तीन वर्षानंतर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या हद्दीत असलेले धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. मात्र, या धरणातील पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी राखीव असलेले पाणी देण्यात यावे, यानुषंगाने पालकमंत्री अमित देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याबरोबर रब्बीतील पिकानांही पाणी कसे मिळेल, याबाबत नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अधिकाऱ्यांना दिले निर्देश -
मांजरा धरण हे परजिल्ह्याच्या हद्दीत असले तरी त्याचा लातूर शहराच्या आणि शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या धरणातील उपलब्ध पाणी काटकसरीने वापरले जावे, त्याचा थोडाही अपव्यय होणार नाही किंवा ते वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. मांजरा धरण या वर्षी शंभर टक्के भरले असून या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे, त्या संदर्भाने पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पाणीसाठा आणि त्यावरील आरक्षण, कालव्याची दुरुस्ती, वीज उपलब्धता व इतर बाबीचा आढावा घेतला.
धरणातील पाणीसाठा आणि त्याचे नियोजन -
मांजरा धरणातील २२४.०९३ दलघमी पैकी १७६.९६३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे ४७.१३ दलघमी मृतसाठा आहे. लातूर महानगर पालिका, लातूर एमायडिसी, कळंब शहर पाणीपुरवठा, अंबाजोगाई शहर पाणीपुरवठा, केज धारूर येथील १२ गावे पाणीपुरवठा तसेच लातूर, कळंब, ऊस्मानाबाद जिल्हा परिषदेच्यावतीने असे एकूण ३२.७३२ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण आहे. तर सिंचनासाठी १०८ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. ६८.०८ दलघमी पाणी बाष्पीभवनामुळे वाया जाण्याची शक्यता आहे, तर १४.८४८ दलघमी एवढा पाण्यात गाळ असण्याची शक्यता धरण्यात आली आहे.
हेही वाचा - ..त्यावेळी तुम्ही काय केले? संभाजीनगर नामांतरासाठी शिवसेनेचा भाजपावर निशाणा