लातूर - उमरगा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना सर्व नियम धाब्यावर बसवून हे काम पार पडले जात आहे. कारण काम सुरू करण्यापूर्वी या मार्गावरील महावितरणची लाईन हटवून पर्याय निर्माण करणे क्रमप्राप्त होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सबंधित कंत्राटदाराने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे.
हेही वाचा- प्रचंड मंदीला सामोरे जाणाऱ्या भारताची अर्थव्यवस्था 'आयसीयू'च्या दिशेने
दळणवळणाच्या दृष्टीने हा राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा राहणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असून दरम्यानच्या कालावधीत वाहतुकदारांची मोठी गैरसोय झाली होती. असे असतानाही महावितरणच्या लाईनवर वाहने आदळून मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याकडे जाणीवपूर्वक होणारी बेफिकीरी जिवावर बेतल्यावरच यंत्रणेला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. लातूर-उमरगा महामार्गाचे औसा ते उमरगा मार्गापर्यंतचे काम पुणे येथील एका बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून अतिशय संथ गतीने व वाहनधारकांसह प्रवाशांसाठी हे काम डोकेदुखी ठरत आहे.
परतीच्या पावसात या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. संबंधीत यंत्रणेने अनेक महिने डांबरीरस्ता खोदून टाकण्यास धन्यता मानली. दीर्घकाळ वाहतूक जाम होत राहिली. इतकेच नव्हे तर अशा ठप्प झालेल्या वाहतुकीत अडकलेल्या रुग्णांना जीव गमवावा लागला. तरीही यंत्रणेला जाग आलीच नाही. शिवाय आतापर्यंत या मार्गावरील विद्युत वाहिनीला पर्याय उपलब्ध करून देण्याचेही कष्ट संबंधित कंपनीने घेतलेले नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. आतापर्यंत लहान-मोठे अपघातही या मार्गावरील विद्युत पोलमुळे झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना अडचणीत टाकून आपल्याच पद्धतीने काम करण्याचा सपाटा या कंपनीने लावला आहे. गुत्तेदाराच्या रटाळ कामाचा नाहक त्रास संपणार तरी कधी? असा संतप्त सवाल वाहनधारकांतून केला जात आहे.