लातूर - गेल्या चार-साडेचार वर्षात सरकारकडून देशाचे संविधान धोक्यात आले आहे. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणून हुकुमशाहीचा उगम होत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये लोकशाहीच्या शस्त्राने ही हुकुमशाही हाणून पाडण्याचे आवाहन भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी रविवारी केले. भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या संविधान गौरव परिषद कार्यक्रमात ते बोलत होते.
भटक्या विमुक्त जमातीमधील आजचे प्रश्न या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संविधान ही प्रत्येक भारतीय नागरिकांची आई आहे आणि तिचे संवर्धन करण्याची वेळ आता प्रत्येकावर येऊन ठेपली आहे. आगामी निवडणूक केवळ एक प्रक्रिया म्हणून नव्हे, तर युद्धाच्या दृष्टीने पाहून लोकशाहीच्या शस्त्राने सत्ताधाऱ्यांना जागा दाखवा.
या राजकीय भूकंपाची सुरुवातही लातूरमधून करण्याचे आवाहन देवी यांनी केले. समतेवर आधारित असलेले देशाचे संविधान बदलण्याचा डाव आरएसएसचा आहे. त्यामुळे हा डाव वेळीच हाणून पाडा अन्यथा आगामी काळात लोकशाही पद्धतीने निवडणुकाही होणार नाहीत. सध्या केवळ भटक्या विमुक्तच नाही, तर प्रत्येकाचा अधिकार डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंसा आणि असत्त्याच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांची कशी दिशाभूल करीत आहेत, याची उदाहरणेही यावेळी डॉ. देवी यांनी दिली.
संविधान हाच खरा चौकीदार असून हुकुमशाहीला बाजूला सारण्याचा सूर या परिषदेत उमटला. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य नागोराव कुंभार हे होते. परिषदेचे प्रास्ताविक प्रा. सुधीर अनवले यांनी केले. यावेळी भटक्या विमुक्त जमतीमधील नागरिक विविध वेशभूषेत उपस्थित होते.