लातूर: जिल्ह्यातील उदगीर येथील महेशकुमार जिवणे यांनी कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांची आई कै. शांताबाई त्र्यंबकराव जिवणे या आजारी असल्याने उदयगिरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान शांताबाई जिवणे यांचा मृत्यू झाला. जुलै,2021 मध्ये महेशकुमार यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करुन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांच्या मातोश्रींना डॉ.नामदेव गिरी व डॉ.माधव चंबुले यांनी संगणमत करुण उपचारासाठी नकली रेमडीसीवर (Fake Remedies) इंजेक्शन देऊन तसेच हे इंजेक्शन खरे आहे, असे भासवून त्यांची 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी डॉ.माधव चंबुले व डॉ.नामदेव गिरी या दोघांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं.279/21 कलम 420 ,274,275,276,34 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉ.गिरी यांच्याविरोधात दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी त्या गुन्ह्यातील फिर्यादी महेशकुमार जिवणे व विकास देशमाने यांनी डॉ. गिरी यांना दीड कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी (due to ransom) केली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मानसिक त्रास देण्यात आला, अशी तक्रार डॉ.गिरी यांच्या पत्नी सुनंदा गिरी यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिली आहे.
आरोपींनी केलेल्या खंडणीच्या मानसिक त्रासाला कंटाळून डॉ . नामदेव गिरी यांनी दि . 25 मे, 2022 रोजी मौजे खेर्डा येथील त्यांच्या राहत्या घरी शेतातील पिकावर फवारणीचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. डॉ. गिरी यांच्या पत्नी सुनंदा गिरी यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महेशकुमार जिवणे व विकास देशमाने यांच्या विरुद्ध गुरनं . 86/22 कलम 306,385,505,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.