लातूर - कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून आरोग्य अधिकारी- कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा सातत्याने राबत आहे. त्यामुळे आता, जनतेची सुरक्षा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी काही सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष पुढाकार घेत आहेत. त्याप्रमाणेच शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच सफाई कामगारांना मास्क, सॅनिटाईझर, फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.
उदगीर शहर वगळता लातूर जिल्ह्यात इतरत्र एकही कोरोना रुग्ण नाही. उदगीर शहरही ग्रीनझोनमध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून 19 मे पर्यंत जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा आशावाद राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष मकरंद सावे यांच्या पुढाकारातून आशा वर्कर, आरोग्य अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटाईजर, फेश शिल्ड याचे वाटप करण्यात आले आहे.
लातूर शहरप्रमाणेच उदगीर मतदारसंघात 8 हजार नागरिकांना अशा प्रकारच्या किटचे वाटप करण्यात आल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. देवदूताप्रमाणे आरोग्य अधिकारी, पोलीस कर्मचारी हे रस्त्यावर काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे ही जनतेची जबाबदारी आहे. राज्य सध्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यावर आहे. त्यामुळे आता कोरोनाशी कसे लढायचे. काय काळजी घ्यायची याची जाणीव सामान्य जनतेला झाली आहे. त्यामुळे स्वतः बरोबर कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन बनसोडे यांनी यावेळी केले.
उदगीर येथील सामान्य रुग्णालयात 13 रुग्णांवर उपचार सुरू असून गेल्या तीन दिवसात एकही कोरोना रुग्ण नव्याने आढळलेला नाही. हीच स्थिती कायम राहिली तर 19 मे पर्यंत लातूर जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या लढाईत जिल्हा प्रशासनाने घेतलेली भूमिका देखील महत्वाची राहिलेली आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून येणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.