लातूर - स्थानिक पातळीवर महिलांचे बचतगट स्थापन करून त्यांचे सक्षमीकरण करण्याची भूमिका 'उमेद'चे कर्मचारी पार पाडत आहेत. राज्य कक्षामार्फत देण्यात आलेले उद्दिष्ट या कर्मचाऱ्यांमार्फत पूर्णही करण्यात आले आहे. असे असताना 10 सप्टेंबर रोजी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुर्ननियुक्ती प्रक्रिया थांबविण्याचे पत्र सरकारने दिले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने सरकारच्या या निर्णयाचा विरोध करीत शुक्रवारी लातूर जिल्हा परिषद येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे सरकारची धोरणे स्थानिक पातळीवर रुजलेली आहेत. त्यामुळेच महिला बचतगटाचे जाळे निर्माण झाले असून अनेकांच्या हाताला कामही मिळाले. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांमुळे हे शक्य झाले त्यांच्याच नोकरीवर आज गदा आली आहे. 10 सप्टेंबर रोजी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुर्ननियुक्ती करू नये, अशा प्रकारचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो कंत्राटी कर्मचारी हतबल झाले आहेत.
हेही वाचा - खासदार विनायक राऊत दहावी नापास, कागदपत्रेही वाचू शकत नाहीत; नाणारवरुन निलेश राणेंची खरमरीत टीका
एप्रिल 2018 पासून ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. शिवाय राज्य कक्षामार्फत देण्यात आलेल्या उद्दिष्टाची पूर्तताही करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम पाहून हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा, अभियान पूर्ववद सुरू ठेवावे, यामध्ये खासगीकरणाचे धोरण आणू नये तसेच कर्मचाऱ्यांना कायम नोकरीवर ठेवावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते. महादेव शेळके, लिंबराज कुंभार, आम्रपाल बनसोडे, देवकुमार कांबळे, अनिता माने, नितीन खंगले, वैभव गुराळे यांची उपस्थिती होती.