लातूर-जिल्ह्यातील धनेगाव येथील महादेव बारसेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे होणारा कावडीचा विवाहसोहळा कोरोनाच्या संचारबंदीमुळे रद्द करण्यात आला. यामुळे यात्रा असूनही मंदिर परिसरात भाविक फिरकले नाही.
संचारबंदीच्या काळात यात्रेच्या तारखा आल्या होत्या मात्र ग्रामस्थानी व परिसरातील लोकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले. यामुळे हेळंबची कावड, बोटकुळची काठी किंवा गावातील मानाच्या काठ्या, अंबीलच्या घागरी अथवा नैवद्य दाखवण्यासाठी किंवा दर्शनासाठी महादेव मंदिराकडे कोणीही फिरकले नाही. मंदिर परिसरात सगळीकडे निरव शांतता होती.
दरवर्षी यात्रेत महादेव मंदिर परिसरात शेकडो भाविक येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या भीतीने कोणी आले नाही. मंदिर परिसरात भाविकांनी जायचे नाही अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आदेशही देवणी पोलिसांनी काढला होता.
सध्या जमावबंदी आदेश व संचारबंदीचे आदेश असल्याने मंदिर परिसरात गर्दी आढळल्यास कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल होणार असल्याचे देवणी पोलिसाकडुन सांगण्यात आले आहे. याबाबत गावात दवंडी देण्यात आली आहे. शिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सर्वत्र संदेश पाठवून जनजागृती करण्यात आली होती.