लातूर - जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे डेंग्यूची साथ असून 46 रुग्ण संशयित आढळून आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. तसेच नागिरीकांनीही योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
शहराला 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे 15 दिवस पाणी पुरावे यासाठी त्याचा वापर काटकसरीने केला जातो. मात्र, याच साठवलेल्या स्वच्छ पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यूची साथ वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मध्यंतरी निलंगा तालुक्यातील औरद शहजनी येथे डेंग्यूने बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात एकही रुग्ण डेंग्यूमुळे दगावला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लातूर शहरात 11, तर संबंध जिल्ह्यात 46 रुग्णांचे नमुने संशयित आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात अहमदपूर, निलंगा, लातूर, उदगीर, देवणी, चाकूर या तालुक्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत.
स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.