लातूर - निलंग्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. यानंतर सध्या गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यासाठी सरपंच शाहूराज पाटील यांनी गावातील युवकांची बैठक घेऊन गाव संरक्षणाचा संकल्प मांडला. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून गाव संरक्षणासाठी कोरोना फोर्स स्थापन करून कोरोनामुक्तीचे आवाहन केले होते.
त्यानुसार लिंबाळ्याच्या सरपंचांनी गावातील युवकांवर ही जबाबदारी सोपवली. त्यास २२ युवकांनी तत्काळ सहमती दर्शवून गेल्या दोन महिन्यांपासून गावात ये-जा करणाऱयांची माहिती नोंदवली. तसेच काही शंका वाटल्यास गावात प्रवेश नाकारण्यात येत आहेत. यामुळे गावाच्या सुरक्षेत भर पडली.
या २२ युवकांनी दिवसरात्र गावासाठी कार्य केले. या युवकांच्या गाव रक्षणाच्या अहोरात्र कार्याची दखल घेत लिंबाळा ग्रामपंचायतीने चालू व थकबाकीचे जवळपास ६० हजार रुपयांचे सर्व कर माफ केले आहे. ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे कोरोना फोर्सच्या युवकांत आनंदाचे वातावरण आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.