लातूर - शहराजवळील सीआरपीफच्या कॅम्पवरून चाकूर येथील बीएसएफच्या कॅम्पकडे जाणाऱ्या जवानांच्या जीपला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याची घटना आहे. यामध्ये एका जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास नांदगाव पाटीजवळील घरणी रेल्वे स्थानकाजवळ घडली. यामधील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जितेंद्र संजय चौधरी (29), गंभीर सिंग आणि एल. देशमुख हे शहराजवळील सीआरपीएफच्या कॅम्पवरून हे चाकूरच्या बीएसएफ कॅम्पकडे फायरिंगसाठी निघाले होते. दरम्यान, नांदगाव पाटीजवळ अहमदपूरकडून येणाऱ्या खासगी बसने (एम.एच.38 एफ 5333) ने इतर वाहनांना ओव्हरटेक करताना जवानांच्या जीपला जोराची धडक दिली यामध्ये जितेंद्र चौधरी (रा. दहिवड ता. चाळीसगाव जि. जळगाव) या जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीरसिंग आणि एल. देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमी जवानांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.