लातुर - निलंगा शहरात भरदुपारी पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृध्दाचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी फुलारी गल्लीत घडली. आपल्या गल्लीतील सार्वजनीक बोअर बंद असल्याने फुलारी दुसऱ्या गल्लीतील सार्वजनीक नळाचे पाणी आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, नगरपरिषदेने गल्लीतील बोअर दुरुस्त न केल्यानेच त्यांच्या जिवावर बेतले असल्याचे बोलले जात आहे. महेबूब पाशा अब्दुल करीम सौदागर असे त्या मृत नागरिकाचे नाव आहे.
शहर पोलीस स्टेशनपासून जवळच असलेल्या फुलारी गल्लीतील महेबूब पाशा अब्दुल करीम सौदागर यांच्या घरासमोरील सार्वजनीक बोअर अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे त्यांना ढोर गल्ली येथील सार्वजनिक बोअरवरुन पाणी भरावे लागते. आज ते पिण्याचे पाणी आणण्यासाठी त्या बोअरला गेले होते. त्यांना वाढत्या ऊनामध्ये बराच वेळ थांबावे लागल्याने, त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले.
निलंग्यातील पाणी टंचाईचा पहिला बळी
त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महेबूब पाशा निलंग्यात पिण्याच्या पाण्यासाठी पहिला बळी ठरले असून नगरपरिषदेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. नगरपरिषदेच्या नियोजनअभावी बोअरला पाणी असतानाही केवळ दुरुस्ती न केल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यामध्ये समन्वय नसल्याने निलंगा शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.