लातूर - पेरणीपासून काढणीपर्यंत खरिपावर टांगती तलवार कायम होती. पेरलं ते उगवलंच नाही त्यानुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. आर्थिक फटका सहन करत शेतकऱ्यांनी पेरणी केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांची जोपासनाही केली मात्र, ऐन काढणीच्या प्रसंगी वरूनराजाची अवकृपा झाली आणि सर्वच पिके पाण्यात गेली. अशा प्रतिकूल परिस्थितीत आता सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाले आहे. परंतु, येथेही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम आहे. गेल्या वर्षभरापासून सोयाबीनचा दर 3800 रुपये क्विंटलच्या पुढे गेला नाही आणि आता तर सोयाबीनची आवक वाढली असल्याने दर घटत आहेत. खरिपातील सोयाबीनचे गणित याचा लेखाजोखा 'ईटीव्ही भारत' ने मांडला आहे.
हेही वाचा - कृषी कायद्यास स्थगिती देणाऱ्या राज्य सरकरच्या आदेशाची लातुरात होळी
सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक असून, लातूर येथील बाजार पेठेत योग्य दरही मिळतो. यामुळे यंदा तर तब्बल 4 लाख 59 हजार हेक्टरवर पेरा झाला होता. मात्र, पेरणीपासून संकटाची मालिका सुरू झाली ती काढणीपर्यंत. महाबीजचे बियाणे शेतकऱ्यांनी जमिनीत गाढले खरे मात्र, त्याची उगवनच झाली नाही. त्यामुळे एकरी 5 ते 6 हजार अधिकचे मोजावे लागले होते. यानंतर चाकूर, अहमदपूर तालुक्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच होती. परंतु, उर्वरित नुकसान झाले ते अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे. उदगीर तालुक्यातील काही मंडळात तर एकाच दिवसात 125 मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे सोयाबीन अंतिम टप्प्यात असताना झालेल्या पावसामुळे पीक काळवंडले आहे. शिवाय अजुनही काही क्षेत्रावरील सोयाबीन हे पाण्यातच आहे. जे वावरात आहे ते पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली. पण, काढणीकरिता मजुरच मिळेना अशी अवस्था निर्माण झाली.
सोयाबीन काढणीला एकरी 5 हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. परतीचा पाऊस सुरू होण्यापूर्वी शेतातील पीक बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांनीही मजुरीची झळ सहन केली. मात्र, निराशा झाली ती बाजारभावाने. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 3500 ते निकृष्ट मालाला 2800 रुपये क्विंटलला दर मिळत आहे. त्यामुळे मशागत, पेरणी, खत फवारणी आणि काढणीला हजारो रुपये खर्ची केल्यानंतर पदरी पैसे तर नाही, पण जनावरांसाठी बुस्कट आल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
गतवर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यंदा तर पेरणीपासून बाजारभावापर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. खर्चाचा आणि उत्पादनाचा मेळ लागत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. तर दुसरीकडे कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहे पटवून देण्यात भाजप, तर कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे हे पटवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार व्यस्त आहेत. यामुळे राजकीय नेते आपल्या पक्षाची पोळी भाजून घेत असले, तरी शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र निराळ्याच आहेत.
हेही वाचा - गाव डोंगरगाव पण भ्रष्टाचाराने पोखरलेले; ग्रामस्थांचे आमरण उपोषण
खरिपातील सोयाबीन आता बाजारपेठेत दाखल होत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाकाठी 40 ते 42 हजार क्विंटलची आवक आहे. पावसाने सोयाबीन काळवंडले असल्याने 2600 ते 2800 दर मिळत आहे. त्यामुळेच पेरणीपासून बाजार भावापर्यंत सोयाबीनच्या उत्पादनात शेतकऱ्यांच्या पदरी काय पडले याबाबत 'ईटीव्ही भारत' ने हा आढावा घेतला.