लातूर - कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीचा परिणाम शेतकऱ्यांच्या बांधावरही झाला आहे. एकीकडे मेट्रो रेल्वे, कृत्रिम पाऊस यासारख्या गोष्टी केल्या आहेत. तर, दुसरीकडे कोरोनामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जुन्या परंपरा नव्याने सुरू होत आहेत. संचारबंदीत ना गाव सोडता येतंय ना बाजारपेठ सुरू आहे. त्यामुळे जे धान्य विकत घेण्यासाठी मजुरी म्हणून पैसे घेतले जात होते त्याऐवजी धान्यच पदरी टाका, अशी मागणी आता मजुरांकडून होत आहे. मुलभूत गरज भागविण्यासाठी बारा बलुतेदारी पद्धत सुरू होताना पाहावयास मिळत आहे. केवळ शेती व्यवसायाशी निगडित मजुरच नाही तर इतर व्यवसायातही अशी पद्धत समोर येऊ लागली आहे.
कोरोनामुळे नागरिकांच्या जीवनपद्धतीमध्येच बदल घडवून आणला आहे. सध्या लातूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी निर्माण झालेल्या परिस्थितीने दूरगामी परिणाम पाहावयास मिळत आहेत. रब्बी हंगामाच्या सुरवातीला शेती कामासाठी येणारा मजूर हा पैसे वाढवून मागत होता. मात्र, गेल्या महिन्याभरात परिस्थिती बदलली आहे. बाजारपेठा बंद आहेत आणि ग्रामीण भागातील वाहनही सुरू नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक असलेले धान्य आणायचे कुठुन हा प्रश्न मजुरांसमोर आहेत.
यावर पर्याय म्हणून मजुरी करतो पण त्याबदल्यात पैसे नको धान्यच द्या, असे म्हणण्याची वेळ मजुरांवर ओढावलीआहे. शेतकऱ्यांनाही हे न परवडणारे आहे पण सध्याची स्थिती आणि ओढवलेले संकट यामुळे मजुरांची मागणी पूर्ण केली जात आहे. पूर्वी कामाच्या बदल्यात धान्यच दिले जात होते. परंतु बदलत्या काळाप्रमाणे पद्धतीही बदलल्या आणि मजुरांना पैसे दिले जात होते. परंतु, आता कोरोनामुळे जुनी परंपरा नव्याने सुरू होत असल्याचे चित्र आहे.